चीनच्या सायबर हेरगिरीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाची गुप्त बैठक.
         Date: 16-Dec-2018

चीनच्या सायबर हेरगिरीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाची गुप्त बैठक.

 

या वर्षी जुलै महिन्यातील एका संध्याकाळी कॅनडामधील नोव्हा स्कॉटीया राज्यातील एका पूर्णपणे गुप्त आणि संरक्षित अश्या रिसॉर्टमध्ये 'Five Eyes' चे सभासद असलेल्या सर्व देशांच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख एका बैठकीसाठी एकत्र आले होते.

 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदो यांनी अटलांटिक प्रदेशातील राज्यांमधील वाढते धोके नियंत्रणात आणण्याचे आवाहन करतानाच जिओपॉलिटिकल धोक्यांविषयी आपली मतेही या बैठकीत मांडली. त्रुदो यांचे बोलणे संपल्यानंतर चर्चेचा सर्व रोख हा 'सर्व राष्ट्रांनी चीनच्या विरोधातील आपली खदखद अथवा विरोध जगजाहीर करावा किंवा कसे' या विषयाकडे वळला होता.

 

 

१७ जुलैच्या त्या बैठकीनंतर; बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वच राष्ट्रांनी, म्हणजे ऑस्ट्रेलिया, युएस, कॅनडा, न्युझीलंड आणि युके या सर्वांनी चीनच्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातील महाकाय कंपनी 'हुवाई'स त्यांच्या नेक्स्ट जनरेशन वायरलेस नेटवर्क साठी उपकरणे पुरविण्यास बंदी घालून चीनविरोधात अभूतपूर्व अशी मोहीमच सुरु केली आहे. मागील आठवड्यात कॅनडातील व्हॅक्यूवर शहरात 'युएसकडून इराणवर घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन' केल्याच्या आरोपाखाली हुवाई च्या चीफ फायनांशियल ऑफिसर 'मेंग वांचों' हीस अटक होऊन तर चीनविरोधातील या एकत्रित मोहिमेने कळसच गाठला आहे.

 

मध्यंतरी युके मध्ये एका डबल एजंटवर झालेल्या रासायनिक हल्ला प्रकरणी सर्व देशांचे रशियाविरोधात एकत्र येणे ही देखील याच भविष्यकालीन घडामोडींची एक चुणूकच होती. त्यावेळी युकेने जाहीररीत्या रशियावर आरोपपत्र ठेवले होते आणि 'Five Eyes' देशांनी त्याला उघडपणे समर्थनच दिले होते. त्या घटनेनंतर रशियाच्या गुप्तचर संघटनेच्या दर्जामध्ये मोठी घसरण झाली हे सर्वांनीच मान्य केले.

 

हेरगिरी आणि परकीय हस्तक्षेप हा कायमच एक व्यापक धोका असल्याची जाणीव त्या घटनेनंतर सर्वांनाच झालेली आहे. ९/११ च्या कुप्रसिद्ध हल्ल्यानंतर या धोक्याकडे दुर्लक्ष झाल्याचे परंतु सरतेशेवटी चीनचा कम्युनिस्ट पक्ष हाच सर्वांसाठी सर्वात मोठा धोका असण्यावर सर्वांचे एकमत झाले.

 

या सर्वांना याचीदेखील जाणीव होती की चीनच्या विरोधात लढा देण्यासाठी आवश्यक असलेले माहिती संकलन, सांस्कृतिक सोयरीक आणि तांत्रिक बळ ते सोडल्यास इतर कुठल्याही आंतरराष्ट्रीय समुदायाकडे नाही.

 

या बैठकीनंतर मायदेशात जाऊन उघडपणे चीनविरोधात आघाडी उघडण्याविषयी सर्वांनीच संमती दर्शविली नसली तरीही चीनविरोधात कृती करण्याचा त्यांचा निर्धार पक्का होता. तसेच या मोहिमेत आपल्याबरोबर जपान आणि जर्मनीसारख्या देशांना बरोबर घेण्यावर मात्र सर्वांचे एकमत झाले होते.

 

या बैठकीनंतर या सर्व देशांच्या गुप्तचर संघटना प्रमुखांकडून हुवाई कंपनीस 5G नेटवर्क्स पासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी जाहीर वक्तव्ये तसेच एकत्रित प्रयत्नांची एक शृंखला दिसून येत आहे.

 

याची सुरुवात ऑस्टेलियातून झाली. पंतप्रधान पदावरून दूर होण्याच्या आधीच्या रविवारी टुर्नबुल यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटचे काम करताना युएसचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून 'हुवाई आणि झेडटीई या दोन्ही चिनी कंपन्यांना देशाच्या 5G नेटवर्क मधून हद्दपार' करीत असल्याच्या आपल्या निर्णयाची माहिती दिली होती.

 

ऑस्ट्रेलियामध्ये नेक्स्ट जनरेशन वायरलेस नेटवर्क्सची निर्मिती करण्या संदर्भातील तत्कालीन सरकारने २३ ऑगस्ट रोजी जाहीर केलेली नियमावली त्यानंतर लगेचच आलेल्या सत्ताबदलाच्या गदारोळात खरेतर हरवूनच गेली.

 

त्या नियमावलीत हुवाई कंपनीचे नाव प्रत्यक्षपणे घेतले गेले नव्हते परंतु बंदी घालताना 'असे विक्रेते ज्यांच्यावर परकीय सरकारने कायदेशीर बंधने घातली आहेत' असा उल्लेख त्यात करण्यात आला होता.

 

त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियन सिग्नल्स डिरेक्टरेट चे डायरेक्टर जनरल माईक बर्जेस यांनी संस्थेच्या ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच जाहीर वक्तव्य करून हुवाई कंपनीस पुन्हा एकदा प्रमुख राष्ट्रीय विषयाचे रूप दिले. अर्थात यावेळीही बर्जेस यांनी हुवाई किंवा झेडटीई कंपन्यांची प्रत्यक्ष नावे घेणे आपल्या भाषणात टाळले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील इलेक्ट्रॉनिक रहस्ये शोधून काढणाऱ्या एका संस्थेचे प्रमुख असलेल्या माईक यांची विचारसरणी एकदम स्पष्ट आहे."चोराला शोधून काढण्यासाठी चोरासारखाच विचार करणे आवश्यक असते. म्हणजेच वेळप्रसंगी तुम्हाला देखील चोराच्या भूमिकेत शिरणे भाग असते". आपल्या टीव्ही मुलाखतीनंतर त्यांनी एक ट्विटर अकाउंट देखील सुरु केले आणि त्यावरून त्यांनी हुवाईवर सौम्य प्रमाणात शेरेबाजी देखील केली. २१ नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड मध्ये एका 5G नेटवर्कचे कोर आणि ऍक्सेस पार्ट असे यशस्वी विभाजन केल्यानंतर त्याची बातमी देताना हुवाई कंपनीच्या अधिकाऱ्याने बर्जेस यांना ट्विटर वर टॅग केले. प्रतिक्रिये दाखल बर्जेस यांनी "Thanks for sharing. In my business I've never seen anything 'fully isolated...'." असे ट्विट केले होते.

 

७ दिवसांनंतर न्यूझीलंडने आपली मोबाईल फोन कंपनी स्पार्क ला 5G उपकरणांचा पुरवठा करण्यापासून हुवाई कंपनीस थांबविले.

 

यानंतर ६ डिसेंबर रोजी कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिसचे प्रमुख डेव्हिड व्हिग्नोल्ट यांनी या वाढत्या धोक्याविषयी आपले पहिले जाहीर वक्तव्य केले.

 

"समृद्ध आणि माहितीवर आधारभूत अश्या अर्थव्यवस्थेची निर्मिती करून ती स्थिर ठेवण्याच्या कॅनडाच्या क्षमतेसाठी अत्यंत आवश्यक अश्या क्षेत्रांमध्ये परकीय शक्तींद्वारे हेरगिरी होण्याचा आलेख CSIS कडून नोंदविण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, 5G, बायोफार्मा आणि शुद्ध तंत्रज्ञान. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ही सर्वच क्षेत्रे कॅनडाच्या भविष्यकालीन प्रगतीचा पाया आहेत".

 

ते चीनविषयीच बोलत आहेत याबद्दल कोणाच्याच मनात शंका नव्हती. येत्या काही आठवड्यात ओटावाकडून हुवाई आणि झेडटीई या कंपन्यांवर प्राथमिक स्वरूपाची बंदी अपेक्षित आहे.

 

डेव्हिड व्हिग्नोल्ट यांच्या या भाषणानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी MI6 च्या प्रमुखांनी देखील चीनविरोधात आपली शस्त्रे पारजली. युकेचा 'Five Eyes' बरोबर एक कळीचा प्रश्न आहे. १५ वर्षांपूर्वी ब्रिटिश टेलीकॉमने हुवाईबरोबर भागीदारीमध्ये एक कंत्राट केलेले आहे आणि आता जेव्हा जेव्हा युकेकडून चीनपासून असलेल्या धोक्याविषयी वक्तव्य केले जाते त्यावेळी या कंत्राटाचेच उदाहरण पुढे करण्यात येते. एका प्रश्नास उत्तर देताना अॅलेक्स यंगर यांनी ब्रिटनच्या या हुवाई प्रश्नावरच सरळसरळ निशाणा साधला.

 

"आपल्या अलायन्समधील काही देशांनी चीनविरोधात ठोस भूमिका स्वीकारलेली आपण पाहत आहोत. अश्या परिस्थितीत तंत्रज्ञान तसेच इतरही क्षेत्रात चीनचा मालकी हक्क आपण नक्की किती काळ कायम ठेवणार आहोत यावर आता विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे", ते म्हणाले.

 

त्याच दिवशी लगेचच आपल्या 3G आणि 4G मोबाईल ऑपरेशन्समधून हुवाईस दूर ठेवीत असल्याची तसेच आगामी 5G नेटवर्कमध्येही हुवाई कंपनीचे तंत्रज्ञान वापरणार नसल्याची घोषणा ब्रिटिश टेलिकॉम कंपनीकडून करण्यात आली.

 

परंतु जेव्हा चीनला विरोध करण्याची वेळ आली तेव्हा युनाइटेड स्टेट्स इतकी आक्रमकता कोणीच दाखविलेली नाहीये.

 

जिना हॅस्पेल या सीआयए च्या नवीन प्रमुख आहेत. परंतु त्यांच्या येण्या अगोदरही सीआयएचे पूर्ण लक्ष चीनवरच केंद्रित होते. मेंग हिला झालेली अटक ही त्यांच्या चीनला वठणीवर आणण्याच्या प्रयत्नांतील एक पायरी म्हणता येईल.

 

चालू असलेल्या ट्रेडवाॅर विषयी ट्रम्प यांनी घेतलेल्या ध्यासाकडे वॉशिंग्टनचे पूर्ण लक्ष असले तरीही चीनविरोधात केवळ ट्रम्प यांनीच आघाडी उघडली आहे असे म्हणणे साफ चुकीचे ठरेल. मागील दोन वर्षात काँग्रेस मधील रिपब्लिक्स आणि डेमोक्रॅट्स आणि डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, स्टेट अँड सिक्युरिटी एजन्सीज या सर्वांचेच 'चीन हा धोरणात्मक धोका' असण्यावर एकमत झालेले आहे.
 

युएस प्रॉसिक्युटर्सनी चिनी हॅकर्स विरोधात खटला दाखल केला आहे तर इतर एका नाट्यपूर्ण स्टिंग ऑपरेशनमध्ये एका अमेरिकन एजंटकडून चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयाच्या डेप्युटी डिरेक्टर येंजॉन शु यास लालूच दाखवून बेल्जीयम येथे बोलाविले जेथे त्यास लष्करी गुप्त माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

 

'ऑपरेशन क्लाउड हॉपर' नावाने एक चिनी हॅकिंग कॅम्पेन चालविले जात असल्याचीही अटकळ बांधण्यात येत आहे. असेही समजले जात आहे की या कॅम्पेनचा शिरकाव ऑस्ट्रेलियासकट संपूर्ण जगातील नेटवर्क्समध्ये झालेला आहे.

 

व्हाईट हाऊस कडून मागील महिन्यात प्रकाशित करण्यात आलेल्या चीनवरील अर्धवार्षिक अहवालात त्यांनी चीनवर आरोपांचा भडीमार केलेला आहे. ते म्हणतात सायबर हेरगिरीच्या क्षेत्रातील आपली वागणूक चीनने कायमच ठेवलेली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही नितीमुल्यांचा त्याग करण्याचेच धोरण त्यांनी कायम स्वीकारले आहे.

 

औद्योगिक क्षेत्राच्या पातळीवरील सायबर धोका हे देखील अनेक कारणांपैकी एक कारण होते ज्यामुळे Five Eye इंटेलिजन्सच्या प्रमुखांना खात्री पटली की चीन आपल्या या हेरगिरीच्या कामात हुवाई कंपनीस जुंपण्यास मागेपुढे पाहणार नाही आणि तसे झाल्यास हुवाई कंपनीपुढे देखील त्या कामासाठी होकार देण्याशिवाय गत्यंतर नसेल.

 

या सगळ्या गोष्टीतूनच संपूर्ण जगाने आजवर न पाहिलेले असे चीनतर्फे चालविण्यात येत असलेले हेरगिरीचे महानाट्य उलगडत गेले.

 

पाश्चिमात्यांनी प्रतिक्रिया देण्यास उशीर नक्कीच केला आहे परंतु आता मात्र त्यांनी या विरोधात कंबर कसली आहे हेदेखील तितकेच खरे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: Afr.com

Secret meeting led to the international effort to stop China's cyber espionage.