२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यास पाकिस्तान जबाबदार - इम्रान खान यांची कबुली.
         Date: 10-Dec-2018

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यास पाकिस्तान जबाबदार - इम्रान खान यांची कबुली.

 

मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांच्या बाबतीत कारवाई करण्याची इच्छा आहे," असे विधान पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेला हल्ला हा पाकिस्तान्यांनी केला असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच त्यांनी या विधानामुळे केली आहे.

 

खान सरकारला "दहशतवादी कृत्यामध्ये" सामील असलेल्यांवर खटला चालवायचा आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत जेव्हा एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा पाकिस्तान दोन पावले पुढे टाकतो असे खान वारंवार बोलत असतात. त्यांच्या या विधानाला बळकटी येण्यासाठी मुंबई हल्ल्यातील दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे.

 

 
 
दहशतवाद विरोधी न्यायालयामध्ये चाललेल्या या खटल्यासंबंधीची कागदपत्रे आम्ही मागविली आहेत असे खान यांनी सांगितले.
 

२६ नोव्हेंबर २००८ साली लष्कर-ए- तोयबा चे दहा सशस्त्र दहशतवादी समुद्रमार्गे मुंबई मध्ये आले आणि त्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट केले. त्यामध्ये ताज हॉटेलचेही बरेच नुकसान झाले. संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या या हल्ल्यात १६६ लोक मारले गेले तर ३०० लोक जखमी झाले.

 

लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन कमांडर झाकी-उर-रहमान लखवीच्या सुटकेसंबंधी विचारले असता त्यांनी सांगितले की," मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना शिक्षा व्हावी असे आम्हालाही वाटते. या खटल्याची माहिती करून घेऊन लवकरच तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू."

 

दहशतवादविरोधी न्यायालयात सात दहशतवाद्यांवर चालविल्या गेलेल्या खटल्याला खान यांच्या विधानाने १० वर्षानंतर थोडीशी गती मिळाली आहे. परंतु त्यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा नसल्याचे वकिलांचे मत आहे. भारताने पाकिस्तानला यांच्याविरोधात असंख्य पुरावे दिले आहेत. जोपर्यंत पाकिस्तान मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना शिक्षा करीत नाही तोपर्यंत दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत.

 

भारताचा रोख लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदवर आहे जो आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित झाल्यानंतरही पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरतोय. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. असे मोदी सरकारने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: WIONEWS

Imran Khan acknowledges 26/11 attacks originated from Pakistani soil.