Date: 25-Nov-2018 |
जून २०१९ पर्यंत भारतीय लष्कराच्या शस्त्रागारात 'वॉल रडार्स' याच नावाने प्रसिद्ध असलेली आणि खरोखरच भिंतीच्या पलीकडले पाहू शकणारी १५० 'थ्रू वॉल रडार सिस्टिम्स' दाखल होण्याची शक्यता आहे. या रडार्समुळे एखाद्या घरात लपून बसलेले अथवा एखाद्या भिंती आड दडलेले दहशतवादी टिपण्यास आपल्या लष्कराला फार मोठी मदत मिळणार आहे.
२० नोव्हेंबर रोजी लष्कराने या संदर्भातील रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन संबंधित उत्पादकांना पाठविली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की आपल्या लष्कराने अश्या प्रकारची प्रणाली यापूर्वी २०१६ मध्येही आयात केली होती परंतु ती अत्यंत अल्प प्रमाणात होती.
राजकीय डावपेचात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवर तैनात असलेल्या आणि कायम घुसखोरांशी झुंझत असलेल्या बटालिअन्स कडे ही अश्या प्रकारची रडार्स असतातच. परंतु जम्मू आणि काश्मीर सारख्या प्रदेशाचा विचार करता, जिथे फार दाटीवाटीच्या आणि दुर्गम प्रदेशात आपल्या सैनिकांना लपूनछपून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा सामना करावा लागतो अश्या ठिकाणी या प्रकारची रडार्स त्यांच्या दिमतीला असतील तर नक्कीच खूप फायद्याचे ठरेल.
भारताने २०१५ ते २०१७ या कालावधीत निरनिराळ्या ठिकाणी चकमकींमध्ये कमीतकमी ४०० अधिकारी गमावले आहेत. तर राष्ट्रीय सुरक्षा पोलीस दलाने आपले १०३ वीर हरविले आहेत. बहुतांश मृत्यू हे डाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांशी आणि जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांशी लढताना झाले आहेत.
ही रडार्स भिंती आड अथवा तश्याच प्रकारच्या एखाद्या अडथळ्यामागे लपून बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या मानवी गुणविशेषांची ओळख पटवू शकते. त्यामुळे अतिरेक्यांची सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी ही रडार्स अत्यंत उपयोगी ठरतील यात शंका नाही. भारतीय लष्कराच्या जवानांना अश्या प्रकाराने सर्च ऑपरेशन पार पाडताना काही काही वेळा प्रक्षुब्ध जमावाचा देखील सामना करावा लागतो. अश्या वेळी जर ही रडार्स असतील तर दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा अचूक वेध घेणे शक्य होईल.
गेल्या काही वर्षात भारतीय लष्कराने अश्या प्रकारे घरांची झडती घेण्याच्या पद्धतीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने काही बदल नक्कीच केले आहेत परंतु अत्याधुनिक उपकरणांच्या गैरहजेरीतच.
लष्कराच्या एका रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख असलेल्या भारतीय लष्करातील एका ब्रिगेडीअरनी सांगितले,"ही नवीन रडार्स प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीना उपलब्ध करून द्यावयास हवीत जेणेकरून त्यांना त्यांच्या हाताळणीचे योग्य ते ज्ञान प्राप्त होईल. आजकाल अनेक लष्करी अधिकाऱ्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हाताळताना योग्य प्रशिक्षणाच्या अभावी अडचणींचा सामना करावा लागतो."
दरम्यान नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्ट. जनरल डीएस हुडा यांनी सांगितले,"सध्या लष्कराच्या वापरात असलेली रडार्स ही फर्स्ट जनरेशन रडार आहेत त्यामुळे ती फारशी प्रभावशाली नाहीत. भारतीय लष्कराला अश्या अत्याधुनिक उपकरणांची गरज आहे ज्याच्यामुळे मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण कमीतकमी राहील. यामुळे युद्धप्रसंगी त्याचा फायदा तर होईलच परंतु त्यामुळे जीवितहानीचे प्रमाणही कमी होईल. अनेक परदेशी लष्करे, ज्यांमध्ये यूएस चा समावेश होतो, अश्या प्रकारची अत्याधुनिक प्रणाली वापरीत आहेत. अफगाणिस्तान आणि इराक मध्ये यूएस लष्कराने अश्याच प्रकारच्या रडार्सचा वापर करून अनेक दहशतवाद्यांचा निःपात केला होता."
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: TOI & SPUTNIK.
Key words: Wall radars.