Date: 24-Nov-2018 |
उयघूर मध्ये मुस्लिमांच्या मुस्लिमपणावर चिनी टाच?
चीनमधील उयघूरमध्ये चीन सरकारकडून एक अजब सर्व्हे करण्यात आल्याचे समजत आहे. येथे सरकारच्या सांगण्यावरून १० लाखांपेक्षा जास्त हान वंशाच्या चिनी नागरिकांवर मुस्लिम नागरिकांच्या घरात प्रवेश करून काही विशिष्ठ गोष्टींचे परीक्षण करून त्याची नोंद करण्याची कामगिरी सोपविण्यात आली होती. मुख्यत्वे येथील मुस्लिम त्यांच्या धर्माविषयी किती कट्टरता बाळगतात हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता.
मानवी वंशांचे अमेरिकन अभ्यासक डॅरेन बायलर यांनी सांगितले की या सर्व लोकांना या घरांमध्ये जाऊन त्या कुटुंबियांशी बोलून, संवाद साधून त्यांची विचारसरणी, तत्वे यांविषयीची निरीक्षणे नोंदविण्यास सांगितले गेले होते. या निरीक्षणादरम्यान अश्या सर्व गोष्टींची, ज्यांच्यामुळे मुस्लिमांची त्यांच्या धर्माप्रती कट्टरता समजून येईल अशा गोष्टींची नोंद करण्याच्या सूचना त्यांस देण्यात आलेल्या होत्या.
या सर्व निरीक्षणकर्त्यांना मुस्लिमांच्या घरात जाऊन रहावयाचे होते. ते स्वतःला त्या कुटुंबियांचे नातेवाईक म्हणवून घेत. तसेच या कुटुंबियांकडून योग्य ती माहिती अक्कलहुशारीने कशी काढून घ्यायची याचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात आलेले होते.
जसे की एखादा कट्टर मुस्लिम दारू अथवा सिगारेटला नकार देईल, म्हणजे कट्टरता तपासण्याचा हा एक मार्ग असू शकतो वगैरे युक्त्या त्यांना सांगण्यात आलेल्या होत्या.
एशिया सोसायटीच्या यूएस चायना रिलेशनशिप वरील केंद्राकडून प्रकाशित झालेल्या अहवालात डॉक्टर बायलर यांनी यातील काही सूचक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. जसे की,'ज्या घरात तुम्ही प्रवेश करीत आहात त्याच्या कुटुंबप्रमुखाने तुमचे स्वागत "अस्सलाम आलेकूम" या अरबी शब्दात केले का? त्यांच्या घरात कुराण होते का? कोणी शुक्रवारी नमाज करीत होते का किंवा कोणी रमझान च्या काळात उपवास केला का? घरातील स्त्रीचे कपडे पूर्ण अंग झाकले जाईल असे आहेत का? घरातील पुरुष मोठाली दाढी राखून आहेत का? अश्या प्रश्नांची उत्तरे जर 'हो' अशी येत असतील तर त्वरित त्या नोंदवहीत उतरवून घेण्यास या सर्व तथाकथित 'नातेवाईकांना' सांगण्यात आलेले होते.
एवढेच नव्हे तर येथील सुमारे दहा लाख मुस्लिमांना चिनी सरकारच्या 'पुनर्शिक्षण' केंद्रात जबरदस्तीने दाखलही करण्यात आलेले होते. चीन सरकारच्या मते कुठल्याही धार्मिक अतिरेकावर छाप बसविण्यासाठीच तसे करण्यात आले होते.
तथापि जे कोणी या केंद्रात राहून आले आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या केंद्रात त्यांच्यावर चिनी तत्त्वप्रणाली आत्मसात करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. त्यांना सातत्याने मुस्लिम धर्म सोडण्यास सांगण्यात आले त्याचबरोबर वारंवार चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे गुणगान गावयास सांगण्यात येत होते.
एकाने तर असेही सांगितले की तेथे काही जणांवर डुक्कराचे मांस खाण्यास व मद्यप्राशन करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती.
या सर्व तथाकथित नातेवाईकांस साधारण एक आठवडा या मुस्लिम नागरिकांच्या घरात राहण्याचे आदेश देण्यात आलेले होते असे डॉक्टर बायलर यांचे म्हणणे आहे.
आणि हा त्यांचा दावा खरा ठरला जेव्हा कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत वृत्तपत्र 'द पीपल्स डेली' मध्ये छापून आले की या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटाला सुमारे ११ लाख चिनी नागरिकांनी सुमारे १७ लाख अल्पसंख्यांक समाजाच्या व्यक्तींबरोबर काही दिवस एकत्रितपणे घालविले.
या सर्व 'नातेवाईकांचा' रोख प्रामुख्याने अश्या कुटुंबीयांकडे होता ज्यांची चीन सरकार आयोजित पुनर्शिक्षण केंद्रात झाडाझडती झाली होती.
असेही म्हटले जात आहे की मागील वर्षी मुस्लिमांसाठी पवित्र मानण्यात आलेल्या रमजान महिन्यात शिंजियांग जिल्ह्यातील मुस्लिमांना उपवास करण्यास चीन सरकारतर्फे बंदी घालण्यात आली होती.
वर्ल्ड उयघूर काँग्रेस यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी अधिकाऱ्यांनी रमजान महिन्यात सर्व हॉटेल मालकांना आपली हॉटेल्स बंद न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच काही विशेष समारंभ, कार्यक्रमाचे आयोजन विशिष्ट पद्धतीने करण्यात आलेले होते. हे सर्व अश्यासाठी होते की जेणेकरून मुस्लिम नागरिकांना उपवास ठेवण्यात अडचणी येऊन पवित्र रमजान पाळता येऊन नये.
चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांवर असाही आरोप होत आहे की त्यांनी लाखो लहान मुलांना (अल्पसंख्यांक समाजाच्या) त्यांचे पालक जिवंत असतानाही जबरदस्तीने त्यांच्यापासून वेगळे करून अनाथालयात ठेवले व त्यांच्या पालकांना वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणांवर स्थानबद्ध करून ठेवण्यात आले.
वर्ल्ड उयघूर काँग्रेस च्या सदस्यांचे असेही म्हणणे आहे की चिनी अधिकाऱ्यांकडून त्यांना कुरणासारखे इतर सर्व काही त्यांना समर्पित करण्यास सांगितले गेले आहे. असे न केल्यास शिक्षेची धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: INDEPENDENT
One million Chinese people 'move into Muslim homes to report on Islamic or unpatriotic beliefs'